नांदेड राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला संकल्प हा सर्व कल्याणार्थ अर्थसंकल्प असून महाराष्ट्राच्या विकासाचा नवा इतिहास लिहिणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाने मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला असून नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे दूरदृष्टी नेतृत्व असलेले महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जाहीर आभार मानले आहेत.
राज्याचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला . या अर्थसंकल्पात राज्यातील सर्वच क्षेत्राला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आणि त्यांना समृद्ध करून हातभार देण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू करून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला आहे . खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कल्याण आणि शेतकऱ्यांचे हित जपणारे हे सरकार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलेली ही योजना ग्रामीण महाराष्ट्राच्या आणि कृषी संपन्न महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सुवर्ण भेट ठरणार आहे . यासोबतच शेतकऱ्यांना आता अवघ्या एक रुपयात पिक विमा मिळणार आहे .मागेल त्याला शेततळे योजना देण्याचा व्यापक विस्तार करण्यात आला असून कृषी क्षेत्राला बळकटी देत असतानाच राज्यातील धार्मिक स्थळांनाही भरीव निधी देण्यात आला आहे .
राज्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठाना महामार्गाने जोडण्याचा संकल्प करण्यात आला असून माहूर - तुळजापूर -आंबेजोगाई - कोल्हापूर या शक्तिपीठांना आता राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात येणार आहे .औंढा नागनाथ- परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगालाही याच राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात येणार असून नांदेड चा गुरुद्वारा राष्ट्रीय महामार्गाने सोडला जाणार आहे . त्यामुळे हे राष्ट्रीय महामार्ग नांदेडच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यासोबतच वीरबाला दिवस नांदेड येथे साजरा करण्यासाठी या महोत्सवासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठीही भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. विचारवंत कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. श्री चक्रधर स्वामी महानुभाव जीर्णोद्धारासाठी विकास निधीची तरतूद करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भरपूर निधीही मंजूर करण्यात आला आहे . स्वर्गीय शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी पन्नास कोटी रुपयांपर्यंत नेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पावले उचलली आहेत. त्यामुळे राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासासाठी तत्पर असणारे सरकार आहे .या विकास कामासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खा. चिखलीकर यांनी आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment