Wednesday, July 26, 2023

नांदेड- बंगळुरू- गोवा विमानसेवेची घोषणा**अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश**मुंबई, हैद्राबादच्या सेवेसाठीही प्रयत्नशील राहण्याची ग्वाही*


नांदेड दि. २६ जुलै २०२३: 

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, नांदेड- बंगळुरू- गोवा मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याचे जाहीर झाले आहे. 

या निर्णयाचे चव्हाण यांनी स्वागत केले आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, 'फ्लाय ९१' नामक नवीन विमान कंपनीने 'उडाण' योजनेंतर्गत नांदेड- बंगळुरू- गोवा ही विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय जळगाव- पुणे- गोवा- हैद्राबाद, सिंधुदूर्ग- पुणे- बंगळुरू- हैद्राबाद, अगात्ती (लक्षद्विप)- बंगळुरू- गोवा या विमानसेवा देखील सदर कंपनीने घोषित केल्या आहेत. दीर्घ काळापासून हवाईसेवेच्या नकाशातून लुप्त असलेले नांदेड शहर या निर्णयामुळे पुन्हा या नकाशात समाविष्ट झाले आहे. मात्र, सदरहू विमान कंपनी नवीन असल्याने तसेच यापूर्वीचे कटू अनुभव लक्षात घेता नांदेडची विमानसेवा सुरळीत व नियमित रहावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

नांदेड शहराची ठप्प पडलेली विमानसेवा 'उडाण' योजनेंतर्गत पुन्हा सुरू करण्यासाठी मी १४ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विस्तृत निवेदन दिले होते. त्यानंतरही मी सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. एवढेच नव्हे तर काही प्रवासी विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना मी वैयक्तिकरित्या भेटून नांदेड व लगतच्या जिल्ह्यांमध्ये असणारी हवाई प्रवासी वाहतुकीची व्यावसायिक संधी निदर्शनास आणून दिली होती. अखेर आता पहिली विमान सेवा जाहीर झाली असून, पुढील काळात नांदेड-मुंबई व नांदेड-हैद्राबादसह इतरही विमान सेवा सुरू करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत राहू, असेही अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे गेल्या २१ जुलै रोजीच त्यांनी महाराष्ट्रातील विमानतळांची दूरवस्था आणि अपुऱ्या विमानसेवेबाबत लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी विधानसभेत बोलताना त्यांनी नांदेडहून 'उडाण' योजनेंतर्गत विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी स्वारस्य दाखवल्याचे सूतोवाच केले होते. मात्र, नांदेड विमानतळाची जबाबदारी असलेली रिलायन्स कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने या विमानतळावरील सुविधा बाधित झाल्या आहेत. नाईट लँडिंग बंद झाले आहे. रिलायन्सने 'डीजीसीए'ला देय असलेले शुल्क देखील भरलेले नाही, याकडे त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. एकट्या अहमदाबादसाठी मुंबईहून रोज १८ विमाने उड्डाण करतात. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात केवळ १५ विमानसेवा उपलब्ध असल्याचे सांगून अशोकराव चव्हाण यांनी राज्यातील विमानसेवांकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचे विमानतळ पुन्हा सुरू करण्यासाठी रिलायन्सकडून वसूल करण्याच्या अटीवर 'डीजीसीए'ची देणी राज्य सरकार आपल्या तिजोरीतून भरेल, अशी घोषणा केली आहे.

No comments:

Post a Comment

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...